पाउस खेळ
डोंगरमाथ्यावर नवल घडे...'घन'श्याम तयाने अडवियले
ए ढग्या...बरस आज तु...म्हणुनी त्यासी थोपविले ||१||
'मेघ'वर्ण मग क्रोधीत होई...विद्युलतेचा धाक दाखवी
झाडे वेली फुले गोजिरी...वाऱ्या सवे तो गरगर फिरवी ||२||
सरसर भाले बरसू लागती...निष्पाप तृण ते झेलुनी घेती
त्या भाल्यांचे मोती होऊनी...कर्णफुले ती डुलू लागती ||३||
चिंब सुळके बोलू लागती...आज आम्हातून शिल्प जन्मती
जलधारेचे स्रोत रेशमी...जिकडे तिकडे धाऊ लागती ||४||
रानफुले ती गाऊ लागती...रानवाटा ऐकुनी भुलती
कर्दळीच्या बनात जाता...परी वाटेतच हरवून जाती ||५||
बघण्या ऐसा खेळ अनोखा...रवी न रहावुन डोकवी माथा
चाहूल लागताच तयाची...ढग घेई गुपचूप पाय काढता ||६||
- कुसुमांजली
- कुसुमांजली
No comments:
Post a Comment