माझ्या मनात तुझ येण जाण आहे

आठवणीचा मेघ सावळा हलकेच बरसून जावा
आणि त्यातला प्रत्येक क्षण मोरपिस होउन रहावा
तो मोरपिसारा उलगडण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

समुद्राची नज़र चुकवत लाट किनाऱ्यावर धावुन यावी
आणि उमटणाऱ्या तुझ्या पाउलांमध्ये अलगद विरून जावी
पाउलखुणा त्या जपण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

क्षितिजाच्या भाळावरल्या चित्रकर्मीची फसगत व्हावी
आणि मुखाकमला वरती तुझीया सप्तरंगांची उधळण करावी
सप्तरंग ते टिपण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

फुलांची होणारी बागेशी ओळख ही कळीपाशीच थांबावी
आणि अंगणात तुझीया स्वप्नसुमनांची पखरण व्हावी
स्वप्ना फुलात त्या रमण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

विशाल तव हृदयाची आसमंता ही भुरळ पडावी
आणि लक्ष लक्ष तारकांना तुझी ओंजळही पुरून उरावी
साक्षीदार तया होण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

कंठातल्या अस्फुट शब्दांनी एकदा तरी वाट चुकावी
आणि अबोल तुझ्या डोळ्यांना सुरमय करून जावी
प्रेमार्त सुर ते छेडण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

तुझ्यात राहून तुलाच फितविण्याचा हा सर्व बहाणा आहे
सागरानेही कधीतरी सरितेकडे झेपावे म्हणुन असेल कदाचित
....माझ्या मनात मात्र तुझ हे येण न परतु पाहे

- कुसुमांजली

No comments: