"भरुन" राहिलेले दत्तगुरु
**"भरुन" राहिलेले दत्तगुरु**
गाभाऱ्यात समोर शांत प्रसन्न मुर्ती, वातावरणात दरवळणारा पुष्पगंध, धुपाच्या मंद सुगंध लहरी आणि जोडीला गुढ शांतता. सगळ कस आॕल-इन-वन पॕकेज.
दर्शन घेणे हा नित्याचाच भाग होता पण आज अवधूत "परके" वाटत होते. तो "परकेपणा" नेमका टिपता येत नव्हता. बरेच दिवसांपासून जे अनेक विचार मनात घोंघावत आहेत त्याचा हा परिपाक होता का?
पुर्वी दत्तस्थानांवर जाऊन येण्याची एक ओढ असायची, ती आताशा नव्हती. अरेरे ! नाही जायला मिळाल म्हणून होणारी जीवाची घालमेल आता शांत होती. वाचनात येणाऱ्या अनुभव, अनुभूती यांच काहीच अप्रूप उरल नव्हत. किंबहुना त्यांच वाचन बंद झाल होत. पुजा, ग्रंथवाचन, पारायणे हे ही आपोआप सुटलेल. याचा अर्थ महाराजांवर असलेल्या भक्तिचा अंत झाला की काय? असल्या नसत्या शंका. नाही म्हणायला नित्य सुर्योदय-सुर्यास्ताच्या वेळी करण्यात येणारे अग्निहोत्र, माळेवरच नामस्मरण आणि ध्यान साधना असे एवढेच काय ते चालू. बरं, अनुभूती वगैरे अस काही म्हणाल तर तस काहीच गाठीशी नाही, ते असावच असा काही आग्रही नाही आणि ती नाही म्हणून खंत ही नाही.
अवधूत. महाराजांनी हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली, **अवधूत** अवस्थेला पोहोचले. **अवस्था**, या शब्दातच *स्वस्थता* आणि *अस्वस्थता* दडलेली आहे. स्वस्थता यासाठी की **पोहोचलो** आणि अस्वस्थता यासाठी की **अजून पुढे पोहोचायच आहे**. आज गाभाऱ्यात असताना याच गुढ शब्दाने वेढून टाकले.
आज मी एका आगळ्या-वेगळ्या **उंबरठ्यावर** होते . माझ्या मागे दर्शनीय अवधूत उभे असल्याचा भास होत होता आणि पुढे तेच अवधूत म्हणजे फक्त अंधःकार. इथे रुचीचा प्रश्न नव्हता. काय आवडत आहे? काय नाही ? यापेक्षा जे घडत होत ते विशेष वाटत होत. बाहेर जाणवणारा *परकेपणा*, आत मात्र *आपलेपणा*चे गाठोडे घेऊन उभा होता.
आतापर्यंत बाहेर शोधणारी नजर अंतर्मुख होऊ लागली. ज्या भगवंताला आपण आपल्यापासून *विलग* करुन बाहेर बसवला आहे मग तो कोण आहे? या एका प्रश्नाने अनेक प्रश्नांची मालिकाच सुरु करुन दिली. अंतंस्थ "श्रीगुरुं"चे पथिकास प्रबोधन सुरु झाले.
अनंत कोटी जीव, अनंत कोटी यात्रा |
खेळीयाची आहे ऐशी विचित्र जत्रा ||
फुंकियले प्राण, गुंफियला श्वास |
जीवा तुझ्या जीवनाचा, कैसा हा आभास ||
सोडी रुपाचा आधार, धरी निरुपाचा संग |
अवलियाच्या झोळीत, दडला समुद्र अथांग ||
शांतीचा विसावा, समाधानची पंढरी |
कुठे शोधू पुसता, नित्य वसे रे अंतरी ||
करी श्वासाचे दोहन, मग बरसे आनंदघन |
पाहुणा चार दिसांचा, बघ जाई रे उडून ||
खेळीयाची आहे ऐशी विचित्र जत्रा ||
फुंकियले प्राण, गुंफियला श्वास |
जीवा तुझ्या जीवनाचा, कैसा हा आभास ||
सोडी रुपाचा आधार, धरी निरुपाचा संग |
अवलियाच्या झोळीत, दडला समुद्र अथांग ||
शांतीचा विसावा, समाधानची पंढरी |
कुठे शोधू पुसता, नित्य वसे रे अंतरी ||
करी श्वासाचे दोहन, मग बरसे आनंदघन |
पाहुणा चार दिसांचा, बघ जाई रे उडून ||
हे असे आहे तर !
गंम्मत म्हणजे इथे काही शोधायचे नाहीच आहे. जे आहे ते फक्त "गमवायच" आहे. रित करायच आहे. मग बाहेरचा "तो" आहेच आत "भरुन" रहायला उत्सुक.
कुणी तरी खुप छान लिहिले आहे...
**तुम्ही जी गोष्ट जाणून घेता, त्याच गोष्टीपासून तुमची मुक्तता होते आणि जी जाणू शकला नाहीत त्याच्याशी तुम्ही बांधलेले राहता.**
**तुम्ही जी गोष्ट जाणून घेता, त्याच गोष्टीपासून तुमची मुक्तता होते आणि जी जाणू शकला नाहीत त्याच्याशी तुम्ही बांधलेले राहता.**
जय गुरुदेव
सादर वंदन
मुक्तानंदमूर्ती
मुक्तानंदमूर्ती
No comments:
Post a Comment