अध्यात्माची विहिर
सदगुरुंची आज्ञा व्हावी, अध्यात्माची विहिर खोदावी |
बुद्धीच्या पाणोठ्या जमिनीवर, विवेकाची पहार रुतावी ||
चित्ताच्या गर्तेत उपसण्या, हरीनामाचे फावडे घ्यावे |
खणता खणता, घाम गाळता, निजध्यानाचे घाव द्यावे ||
विचार-मातीची ढिखळे निघता |
होई षड्रीपू-खडकांचा ही निपटा ||
उन-पाऊशी खेळ जीवनी |
परी लक्ष्य कधी न देई त्यजुनी ||
काळ सरता, शेवटचा तो प्रहार पडता |
मायेचे ते कवच भेदुनी, झरा अखंड चैतन्याचा ||
अलिप्ततेचे लिंपण देऊनी, सत्संगाचा काठ घालूनी | शांतीची मग मोट बांध तू ||
समाधानाची घेऊनी घागर, ओढुनी दोरी परमार्थी सत्वर | रितेपणाचा ओघ साध तू ||
जीवनाचे सार्थक करण्या, सदगुरुंना शरण जाऊनी |
आंनदाचे लेणे शेंद तू, आंनदाचे जिणे शेंद तू ||
जय गुरुदेव
सादर वंदन
मुक्तानंदमूर्ती

No comments:
Post a Comment