कुसुम गान
उमलू द्याना... फुलू द्याना...झाडावरती झुलू द्याना | वाऱ्यासवे डोलुनी जरासे...गंध वेंधळा उधळू द्याना || १ || दवबिंदूंचे थेंब चमचमते...अंगावरती लेवू द्याना | सेवून सहस्त्रकिरण रेशमी ... सोन पाकळ्या पसरू द्याना || २ || कृष्णमेघे चिंब भिजूनी... कोवळी थरथर जाणवू द्याना | पान पासोडी ओढूनी सत्वर ... एक डुलकी काढू द्याना || ३ || मधुशर्करा घेऊनी ओठी... गुंजारव मज ऐकू द्याना | सुमधूर फळ ते पिकुनी नंतर.... ओंजळ रसवंती भरू द्याना || ४ || सुरक्षित रहता यावे मजला...घातलेस का तू काटेरी कुंपण? अरे वेड्या! पुरले असते इवलाश्या त्या तळहातांचेही कोंदण || ५ || ऐकले नाहीस ना तू...घेतलेस ना मजला तोडून !!! असे किती ते आयुष्य माझे?...पण तू घे तूझी फुलदाणी सजवून ....पण तू घे तूझी फुलदाणी सजवून || ६ || - कुसुमांजली